Sarfaraj Khan
Sarfaraj Khan

धरमशालेत सर्फराज खानचा धमाका! मिस्टर ३६० अंदाजात ठोकला गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सर्फराज खानने ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं अर्धशतकी खेळी केली. व्हिडीओ एकदा पाहाच.
Published by :
Team Lokshahi

भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटचा पाचवा कसोटी सामना धरमशाला येथे होत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांची पुरती दमछाक केली आणि इंग्लंडचा संघ २१८ धावांवर गारद केला. त्यानंतर भारताच्या पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्मा (१०३) आणि शुबमन गिलने (११०) शतकी खेळी केली. परंतु, सर्फराज खानने ठोकलेल्या षटकाराची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. सर्फराजचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

रोहित आणि शुबमन बाद झाल्यानंतर देवदत्त पड्डीकल आणि सर्फराज खान यांनी संघाची कमान सांभाळली. विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या सर्फराजने अर्धशतक झळकावून पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या. सर्फराजने ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं पन्नास धावांचा टप्पा गाठला.

सर्फराज ३४ धावांवर खेळत असताना मार्क वूडच्या गोलंदाजीवर त्याने अपर कट फटका मारला. ते पाहून क्रिकेटप्रेमींना सूर्यकुमार यादवच्या आक्रमक खेळीची आठवण नक्कीच झाली असेल. त्यानंतर सर्फराजने एका चेंडूवर पुल शॉट मारून लेग साईडला गगनचुंबी षटकार ठोकला. या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

भारतासाठी सलामीवीर यशस्वी जैस्वालने ५८ चेंडूत ५७ धावा केल्या. रोहित शर्माने १०३, शुबमन गिलने ११० धावांची शतकी खेळी केली. तर पड्डीकलने ६५ आणि सर्फराज खानने ५६ धावा करत अर्धशतक ठोकलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com