Smriti Mandhana & Palash Muchhal: स्मृती मानधना–पलाश मुच्छल नात्यात पूर्णविराम; लग्न रद्द, सोशल मीडियावरूनही अनफॉलो
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्यावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नासंदर्भातील चर्चा सुरू होत्या, मात्र आता दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर त्यांचं नातं पूर्णपणे तुटल्याचं स्पष्ट झालं आहे. स्मृतीच्या या कृतीनंतर चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून या विषयावर नवी चर्चा रंगू लागली आहे.
स्मृती आणि पलाश गेली सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या कुटुंबीयांचीही या नात्यास संमती होती. याच वर्षी त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आणि २३ नोव्हेंबर हा विवाहाचा मुहूर्त ठरवण्यात आला. परंतु लग्नाआधीच स्मृतींचे वडील श्रीनिवास मानधना यांना हार्ट अटॅक आल्याने सर्व तयारी तातडीने थांबवावी लागली. लग्न पुढे ढकलल्यानंतर दोघांच्या नात्याविषयी विविध अफवा पसरू लागल्या.
दरम्यान सोशल मीडियावर पलाश मुच्छलचे बाहेरील संबंध असल्याच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या. या चर्चांमुळे दोघांच्या नात्यावर नकारात्मक परिणाम झाल्याचं बोललं जाऊ लागलं. तथापि, पलाशची बहीण आणि स्मृतीचे व्यवस्थापक तहन मिश्रा यांनी पुढे येऊन, “स्मृतींच्या वडिलांची प्रकृती पूर्णपणे सुधारल्यानंतरच लग्न केले जाईल,” असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे त्या वेळी या अफवांना थोडा ब्रेक मिळाला.
मात्र आता परिस्थिती बदललेली दिसते. स्मृती मानधनाने तिच्या इंस्टाग्राम फॉलो लिस्टमधून पलाशला हटवलं आहे. पलाशनेही असेच पाऊल उचलल्याचं दिसून आलं आहे. दोघांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या पोस्टमधूनही नातं संपल्याचे संकेत मिळत होते. परिणामी, चाहते आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक जण या नात्याच्या शेवटाबाबत आता जवळजवळ खात्री बाळगत आहेत.
स्मृती–पलाशचं नातं क्रिकेट आणि संगीत क्षेत्रातील चर्चेचा विषय होता. दोघांची जोडी चाहत्यांना नेहमीच आवडायची. परंतु अचानक घडलेल्या या घडामोडींमुळे त्यांचं लग्न रद्द झालं असल्याचं अधिक ठामपणे समोर आलं आहे. दोघांकडूनही अधिकृत वक्तव्य आलेलं नसून, या संपूर्ण प्रकरणावर ते मौन बाळगून आहेत.
दरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या नात्याबाबत मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या दोघांनी स्पष्टपणे बोलावं, अशी मागणी केली आहे. स्मृती मानधना ही भारतीय संघातील महत्त्वाची खेळाडू असून तिची व्यक्तिगत आयुष्यातील ही मोठी घटना चाहत्यांच्या नजरेतून सुटलेली नाही.
आता या प्रकरणाबाबत पुढील काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दोघेही त्यांच्या कामात व्यस्त असले तरी वैयक्तिक आयुष्यातील या निर्णयामुळे त्यांच्या भविष्यात काय बदल होतात, याची उत्सुकता कायम आहे.
