IND vs SA, 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 288 धावांचे लक्ष्य

IND vs SA, 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 288 धावांचे लक्ष्य

Published by :

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये बोलँड पार्कच्या (Boland park ground) मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर 288 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (India vs South Africa) बोलँड पार्कच्या (Boland park ground) मैदानावर दुसरा वनडे सामना होत आहे. भारताचा कप्तान केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऋषभ पंतच्या ८५ धावा आणि राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आफ्रिकेला २८८ धावांचे आव्हान दिले आहे. अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर शार्दुल ठाकूरने संघासाठी ४० धावांची खेळी केली.

केएल राहुल आणि शिखर धवन यांनी भारताच्या डावाची उत्तम सुरुवात केली. नवव्या षटकात दोघांनी भारताचे अर्धशतक फलकावर लावले. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी केली. एडन मार्करामने धवनला (२९) तर केशव महाराजने विराट कोहलीला (०) बाद करत भारताला लागोपाठ दोन धक्के दिले. महाराजने विराटला बावुमाकरवी झेलबाद केले. राहुलने ऋषभ पंतला सोबत घेत भारताला आधार दिला. पंतने आक्रमक फलंदाजी करत राहुलच्या अगोदरच अर्धशतक फलकावर लावले. २५ षटकात भारताने २ बाद १४१ धावा केल्या. राहुलनेही संयमी अर्धशतक पूर्ण केले. ५५ धावा करताच राहुलला सिसांडा मगालाने बाद केले. राहुल आणि पंतने शतकी भागीदारी फलकावर लावली. राहुलनंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. राहुल माघारी परतल्यावर पंतही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सीने त्याला ८५ धावांवर बाद केले. पंतने १० चौकार आणि २ षटकार ठोकले. भारताने २०७ धावांवर आपला पाचवा गडी श्रेयसच्या रुपात गमावला. कारकिर्दीच्या दुसऱ्या वनडेत व्यंकटेश अय्यर २२ धावांचे योगदान देऊन अँडिले फेलुक्वायोचा बळी ठरला. मागील सामन्यात अर्धशतक ठोकलेला शार्दुल ठाकूर पुन्हा भारतासाठी धावून आला. त्याने अश्विनसह छोटेखानी भागीदारी रचली. शार्दुलने ३ चौकार आणि एका चौकारासह नाबाद ४० धावांची खेळी केली. तर अश्विन २५ धावांवर नाबाद राहिला. भारताने ५० षटकात ६ बाद २८७ धावा केल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com