Suryakumar Yadav
Suryakumar Yadav

T-20 World Cup 2024: डेविड मिलरच्या झेलबाबत सूर्यकुमार यादवने केला मोठा खुलासा, म्हणाला; "चौकार वाचवण्यासाठी..."

टी-२० वर्ल्डकप २०२४ चा फायनलचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगला. या सामन्यात भारताने आफ्रिकेचा पराभव करून टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली.
Published by :

Suryakumar Yadav On Taking David Miller Catch: टी-२० वर्ल्डकप २०२४ चा फायनलचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगला. या सामन्यात भारताने आफ्रिकेचा पराभव करून टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. पण या सामन्याचा खरा शिल्पकार सूर्यकुमार यादवच ठरला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण दक्षिण आफ्रिका या सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर असताना सूर्यकुमारने डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल पकडला आणि भारतानं सामना खिशात घातला. अशातच आता सूर्यकुमार यादवने मिलरच्या झेलबाबत मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

माध्यमांशी बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, जेव्हा मी धावत होतो, त्यावेळी मी झेलबाबत विचार करत नव्हतो. मी चौकार वाचवण्यासाठी जोरात धावलो होतो. मला चेंडू पुन्हा मैदानात फेकायचा होता, जेणेकरून संघासाठी दोन किंवा तीन धावा वाचवता येतील. मी झेलबाबत विचार केला नव्हता. जेव्हा मी चेंडूपर्यंत पोहोचलो आणि चेंडू माझ्या हातात आला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, माझ्याकडे झेल घेण्यासाठी आणि चेंडू वर फेकण्याची संधी आहे. मला वाटलं की, मी बाहेर जाऊन पुन्हा मैदानात येऊन तो झेल पकडू शकतो. माझ्याकडे तो निर्णय घेण्यासाठी ५-७ सेकंदाची वेळ होती. माझ्यासाठी हे ५-७ सेकंद नेहमीच अविस्मरणीय राहतील.

बारबाडोसच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या फायनलच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने एक जबरदस्त झेल पकडला होता. हा झेल निर्णायक ठरल्याने भारताने टी-२० वर्ल्डकपच्या फायनलच्या सामन्यात विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात १६ धावा करायच्या होत्या. या षटकाची जबाबदारी हार्दिक पंड्याला दिली होती. हार्दिकने पहिलाच चेंडू ऑफ स्टंपला फुल टॉस टाकला. ज्यामध्ये मिलरने समोरच्या बाजूनं मोठा फटका मारला. परंतु, सूर्यकुमारने अप्रतिम क्षेत्ररक्षण करून चेंडू सीमारेषेपार होण्यापासून थांबवला आणि झेलही घेतला. मिलर बाद झाल्यानंतर भारताचा विजय निश्चित झाला होता आणि टीम इंडियाने ७ धावांनी फायनलचा सामना जिंकला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com