T20 Worldcup 2026: दिग्गज क्रिकेटर्स खेळणार की नाही? संघात फेरफाराची शक्यता
श्रीलंका आणि भारतात ७ फेब्रुवारीपासून होणाऱ्या टी२० वर्ल्डकप २०२६ साठी २० संघांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, दुखापतींमुळे अनेक संघांना धक्का बसला आहे. भारतीय संघात तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना इजा झाली असली तरी ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कर्णधार मिचेल मार्शच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन संघाला वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा आधार मिळणार नाही. पाठीच्या दुखापतीमुळे कमिन्स पाकिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडलाच गेला नाही आणि वर्ल्डकपच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्येही खेळणार नाही.
ऑस्ट्रेलियाने १९ जानेवारीला पाकिस्तान दौऱ्यासाठी १९ खेळाडूंचा संघ जाहीर केला, ज्यात कमिन्सचा समावेश नाही. निवड समिती अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी सांगितले की, कमिन्सची पाठीची दुखापत अजून बरी झालेली नाही, त्यामुळे आराम दिला आहे. वनडे आणि कसोटी कर्णधार कमिन्स वर्ल्डकपच्या तिसऱ्या-चौथ्या सामन्यात परतेल, अशी आशा आहे. ऑस्ट्रेलियाचा साखली फेरी गट श्रीलंकेत आहे, ज्यात आयर्लंड, ओमान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. पहिला सामना ११ फेब्रुवारीला आयर्लंडशी आणि दुसरा १३ फेब्रुवारीला झिम्बाब्वेशी होईल, जे कमकुवत विरोधक असल्याने कमिन्सचा अभाव फारसा जाणवणार नाही. मात्र, १६ फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत तो फिट होईल, असे अपेक्षित आहे.
एशेज कसोटी मालिकेत कमिन्सने फक्त एकच सामना खेळला होता. त्याचा जोडीदार जोश हेझलवूडलाही दुखापतीतून सावरत आहे, पण वर्ल्डकपपूर्वी फिट होण्याची शक्यता आहे. हेझलवूड एशेजमध्ये खेळला नव्हता. दुखापतींमुळे ऑस्ट्रेलियाच्या मोहिमेवर परिणाम होईल का, ही उत्सुकता वाढली आहे. स्पर्धा जवळ येत असताना संघांना फिटनेसवर लक्ष केंद्रित करावे लागेल.
