चक्क शिवाजी महाराजांचा दुर्गाडी किल्लाच नावावर करण्याचा प्रयत्न

कल्याणच्या किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगण्याचा प्रयत्न; महात्मा फुले पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल

कल्याण : किल्ले दुर्गाडीच्या जागेवर नाव लावण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या विरोधात कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुयश शिर्के सातवाहन असे या व्यक्तीचे नाव आहे. तो माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीचे अध्यक्ष असल्याचे त्याने म्हंटले होते. त्याने किल्ले दुर्गाडीच्या जागेवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यासाठी सबळ कागदपत्रे सादर केली नसल्याचे उघड झाले आहे.

कल्याणमधील किल्ले दुर्गाडी हे स्थान शिवकालीन आहे. किल्ले दुर्गाडी हा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आहे. माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटन स्थळ विकास समितीचे अध्यक्ष शिर्के सातवाहन याने कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. या अर्जानुसार त्याने एका जमीनीच्या उताऱ्यावर ना हरकत दाखल मागितला होता. हा अर्ज जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयाकडे चौकशीकरीता गेला. त्याठिकाणाहून चौकशी होऊन तो कल्याण तहसील कार्यालयास प्राप्त झाला.

कल्याण तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रिती गुडे यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे की, ज्या जागेसंदर्भात शिर्के सातवाहन याने नाव लावण्याकरीता अर्ज केला होता. त्याठिकाणी किल्ले दुर्गाडी आहे. किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगणाऱ्या शिर्के सातवाहन याने सादर केलेली कागदपत्रे ही साक्षांकीत आणि नोंदणीकृत नसल्याचे दिसून आले.

तसेच अधिकची तपासणी आणि छाननी केली असता शिर्केची कागदपत्रे ही संशयास्पद, बनावट आणि बोगस असल्याचे दिसून आले, असे मंडळ अधिकारी गुडे यांनी म्हटले आहे. तसा अहवालच गुडे यांनी कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांना सादर केल्यावर देशमुख यांच्या आदेशानुसार गुडे यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिर्के याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात तहसीलदार देशमुख यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीने दुर्गाडीच्या जागेवर नाव लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याचे पुरावे त्याने सादर केलेले नव्हते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com