Arjun Khotkar यांनी चुकीच्या फॉरमॅटमध्ये निवडणुकीचा अर्ज दाखल केल्याचा आरोप
जालन्यातील शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकरांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्याचा आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार कैलास गोरंटयाल यांनी केला आहे. अर्ज छाननीच्या वेळी खोतकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेऊनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खोतकर यांचा उमेदवारी अर्ज रद्द न करता कायम ठेवला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात गोरंटयाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केल्याचं म्हटलं आहे.
अर्जुन खोतकर यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरल्याचा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. आमच्या वकिलांनी चर्चा केली तेव्हा खोतकर यांचा फॉर्म रिजेक्ट होणार अशी शक्यता वाटली. मात्र, निवडणूक आयोगाने ८-१० तासांनंतर आपला निर्णय कळवला. त्यादिवशी रात्री ११ वाजता चुकीच्या पद्धतीने फॉर्म सिलेक्ट करण्यात आला असल्याचं गोरंट्याल म्हणाले. त्यास आव्हान देण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.