Pune Metro : कसे आहेत पुण्यातील मेट्रोचे 'हे' दोन मार्ग?

गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांसाठी उत्सुकतेचा विषय ठरलेल्या पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा आजपासून पुणेकरांच्या सेवेत सुरु झाला आहे
Published by :
Team Lokshahi

पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांसाठी उत्सुकतेचा विषय ठरलेल्या पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा आजपासून पुणेकरांच्या सेवेत सुरु झाला आहे. दुसऱ्या टप्प्यामधील दोन मार्गिका आजपासून पुणेकरांना सेवा देताना पाहायला मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोच्या विस्तारित मार्गाला हिरवा कंदील दाखवला आहे.

कसा आहे पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा?

पहिला मेट्रो मार्ग गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉलपर्यंत तर दुसरा मेट्रो मार्ग फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आहे. या दोन्ही मार्गावरील मेट्रोने आजपासून पुणेकरांना प्रवास करता येणार असून एकूण १३ किलोमीटर लांबीच्या या दोन्ही मार्गिका असणार आहेत.

पहिली मार्गिका- गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल

स्थानके – गरवारे महाविद्यालय, डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगर पालिका, सिव्हील कोर्ट, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल

अंतर ५ किलोमीटर

दुसरी मार्गिका – फुगेवाडी ते सिव्हीलकोर्ट

स्थानके – फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, शिवाजी नगर, सिव्हील कोर्ट

अंतर ८ किलोमीटर

दोन्ही मार्गावर मेट्रोमार्गावर तिकीट दर साधारण १० ते ३० रुपये आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात सर्व स्थानके जमिनीच्या वर होती. दुसऱ्या टप्प्यात दिल्लीप्रमाणेच पुण्यातही अंडरग्राउंड स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. सिव्हील कोर्ट हे स्थानक अंडरग्राऊंड आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकांवर सुरुवातीच्या काळात साधारण दीड लाख पुणेकर प्रवास करतील. विशेष म्हणजे सिव्हील कोर्ट स्टेशन हे मेट्रोच इंटिग्रेटेड स्टेशन आहे.

पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन्ही मार्ग या ठिकाणी एकत्र आले आहेत. या स्टेशन मधील पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील स्टेशन हे जमिनीखाली (अंडरग्राउंड) तर वनाज ते रामवाडी मार्गावरील स्टेशन हे जमिनीवर एलिव्हेटेड) आहे. दोन्ही स्टेशन सरकता जिना तसेच लिफ्टच्या माध्यमातून जोडलेले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी व वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय हे एकूण १२ किलोमीटरचे दोन मार्ग ६ मार्च २०२२ रोजी पुणेकरांसाठी सुरू झाले होते. आता जवळपास सव्वा वर्षांनंतर पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिका पुणेकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com