Nana Patole : "महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून भाषेचा नवीन मुद्दा सुरु"- नाना पटोले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते सुरेश भैय्याजी जोशी यांच्या एका विधानावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. भैया जोशी हे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, "मुंबईला कोणतीही एक भाषा नाही. त्यामुळे मुंबईत येण्यासाठी मराठी शिकण्याची गरज नाही." या विधानामुळे महाराष्ट्रात राजकारण चांगले तापलेले पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी माध्यामांशी संवाद साधला आहे.
नाना पटोले म्हणाले की, "सध्या केंद्रात आणि राज्यात सुरु असलेले सरकार हे भैय्याजी जोशी यांचे आहे. महाराष्ट्रातील जनतेला खरी- खोटी सुनावणे ही सरकारची जबाबदारी नाही. आज महाराष्ट्रात काही भागात वीज नसल्याने शेतकऱ्यांची पीक सुकत आहेत. या सरकारला शेतकरी महत्त्वाचा नाही. महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. लोकांचे पाय शहराकडे वळल्याने गाव खाली झाले आहेत. पण याची चिंता आरएसएसला नाही. हे महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून भाषेचा नवीन मुद्दा सुरु केल्याने बाकीच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्याचे काम सरकार करत आहे. आपल्या देशांमध्ये विविध भाषा, जाती धर्म असलेला भारत देश आहे."
पुढे नाना पटोले म्हणाले की, "सध्या केंद्रात अदानीचे सरकार सुरु आहे. आज कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी हे मुंबईत दाखल होणार आहेत. ज्या पद्धतीने मुंबईला बरबाद करण्याचा मोहोल काही लोक तयार करत आहे. याआधी कधी भाषेवरुन वाद होत नव्हता मग आता का? असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे." असे कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे.