संजय राठोडांना मंत्री करत शिवसेनेला दिला राजकीय संदेश
उद्धव ठाकरे यांनी भाजपला दूर करत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबतीने सरकार स्थापन केले होते. दुखावलेला भाजप याचा वचपा काढणार हे उद्धव ठाकरे यांना चांगलेच माहीत होते. यामुळे आपल्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडू नये, यासाठी त्यांनी खबरदारी घेतली होती. परंतु पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड अडचणीत आले आणि विरोधकांच्या दबावापुढे उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घेतला.
संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यास एकनाथ शिंदेंनी विरोध केला होता. राठोड यांच्या मागे बंजारा समाज आहेच, परंतु विरोधकांपुढे झुकण्याऐवजी आपल्या मंत्र्यांच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे, असे पोटतिडकीने एकनाथ शिंदे सांगत होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी शिंदेंचे ऐकले नाही आणि विरोधकांच्या दबावास बळी पडत राठोड यांचा राजीनामा घेतला.
राज्यात आता शिंदेंचे सरकार आले. संजय राठोडच्या समावेशानंतर गदारोळ होणार हे माहीत असतांना दिलेला शब्द खरा करुन दाखवण्यासाठी संजय राठोड यांना शिंदेंनी मंत्रिपद दिले. टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नावे विस्ताराच्या आधीच आली. त्यानंतरही सत्तार यांचाही समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला. दोन्ही प्रकरणातून आपल्या आमदारांची मने जिंकत उद्धव ठाकरे यांना राजकीय संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला.