Winter Season : थंडीतील पार्ट्यांना महागाईची फोडणी, माशांचा तुटवडा,चिकनही महागलं
हिवाळ्याच्या दिवसांत मांसाहारी जेवण आणि पार्टींची खास मजा असते. थंडीमध्ये मासे, चिकन, मटण यांची चव अधिकच खुलते. मात्र यंदाच्या थंडीच्या हंगामात मांसाहारप्रेमींच्या आनंदावर महागाईने मोठे सावट टाकले आहे. मासे, चिकन आणि मटणाच्या दरात झालेल्या वाढीमुळे घरगुती जेवणापासून ते पार्टीपर्यंत सगळ्याच गोष्टी महाग झाल्या असून, सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे.
राज्यात अनेक भागांत हवामानातील बदलांचा थेट परिणाम मासेमारीवर झाला आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी ढगाळ वातावरण तर कधी थंडी कमी-जास्त होत असल्याने समुद्रात मासेमारीवर मर्यादा येत आहेत. परिणामी बाजारात माशांचा तुटवडा निर्माण झाला असून, याचा थेट फटका ग्राहकांना बसत आहे. बांगडा, पापलेट, सुरमई, रावस यांसारख्या माशांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
काही ठिकाणी माशांचे दर किलोमागे २०० ते ४०० रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे. फक्त मासेच नव्हे तर चिकनच्या दरांनीही मांसाहारप्रेमींची डोकेदुखी वाढवली आहे. गेल्या काही आठवड्यांत चिकनचे दर सातत्याने वाढत असून, अनेक शहरांमध्ये चिकनचे दर किलोमागे २८० ते ३२० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. खाद्यपदार्थांच्या किमती, वाहतूक खर्च, खाद्यधान्यांची महागाई आणि पोल्ट्री उद्योगावर वाढलेला खर्च यामुळे चिकन महागल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
मटणाचे दर तर आधीपासूनच जास्त असल्याने सर्वसामान्य माणूस मटणाकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. थंडीच्या दिवसांत घरगुती पार्टी, मित्रमंडळींच्या भेटी, वाढदिवस किंवा छोट्या समारंभांमध्ये मांसाहाराचा बेत आखताना आता अनेकजण दोनदा विचार करत आहेत. काही जणांनी तर मांसाहाराचे प्रमाण कमी करून शाकाहारी पदार्थांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. विक्रेत्यांच्या मते, पुढील काही आठवडे मांसाहाराच्या दरात फारशी घट होण्याची शक्यता नाही. मासेमारी नियमित सुरू झाली आणि पुरवठा सुरळीत झाला, तरच दर काहीसे नियंत्रणात येतील. तोपर्यंत थंडीतील पार्टींवर महागाईची फोडणी कायम राहणार असून, मांसाहारप्रेमींना आपले खिसे सावरूनच जेवणाचा बेत आखावा लागणार आहे.
