११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरु होणार…
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे दहावीचा निकाल अंतर्गत मुल्यमापनाद्वारे जाहीर केला होता. ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होणार आहेत, तर राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेपूर्वी राज्य मंडळातर्फे सीईटी घेतली जाणार आहे,त्यानुसार ११ वी प्रवेशाची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे.
१६ ऑगस्टपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक अमरावती, नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेळ केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येतील. सीईटी परीक्षेपुर्वी अर्जाचा पहिला भाग आणि परीक्षेनंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.
विद्यार्थांच्या सोयीकरिता सरावासाठी १३ ऑगस्टपासून तात्पुरती नोंदणी करता येणार आहे. सीईटी परीक्षेपुर्वी अर्जाचा पहिला भागात विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती त्यासोबत शुल्क भरुन अर्ज लॉक करायचा आहे. सीईटी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सीईटीचे गुण आणि पसंती क्रमांक यासाठी अर्जाचा दुसरा भाग भरायचा आहे.यासंदर्भात वेळापत्रक काही दिवसांमध्ये संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.