राज्यात जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान; विदर्भाला सर्वाधिक फटका
राज्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 1.70 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला आहे. 01 आणि 02 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम कृषी विभागाकडून अद्याप सुरू केले नाही.
जुलैमध्ये राज्यातील 36 पैकी 25 जिल्ह्यांना कमी-जास्त प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसला. नुकसानीचे प्रमाण विदर्भात जास्त होते. विदर्भात सुमारे 97 हजार 652 हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांना फटका बसला. त्या खालोखाल मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भात, ऊस, सोयाबीन, नाचणी, भुईमूग आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. तर ऑगस्टमध्ये 20332.79 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात यंदाच्या खरिपात ऊस वगळून सरासरी 1,43,21,439 हेक्टरवर पेरणी होते. यापैकी सोयाबीनची पेरणी 50,52,533 हेक्टरवर झाली आहे. सोयाबीनचे चांगले उत्पादन निघून चांगले पैसे होणे अपेक्षित असतानाच जुलै आणि ऑगस्टमधील पावसाने राज्याच्या सर्वच भागातील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.