Eknath Shinde : शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना..."
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत. त्यामुळे आज राज्य सरकारने शेतकऱ्यांना 31 हजार 628 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करताना, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, त्याआधी त्यांना मदत केली जाईल असं जाहीर केले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘शेतकऱ्यांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. मी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधावर जाऊन पाहणी केली आहे.’
गेल्या अनेक वर्षात इतका पाऊस पाहिला नाही. 253 तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आम्ही 2-3 बैठका घेतल्या. शेतकऱ्याच्या मागे आमचे सरकार आहे, हे आमचे कर्तव्य आहे. या भावनेतून आम्ही 31 हजार 628 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. पशुधनाचे, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही मदत दिली जात आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, ‘ही दिवाळी काळी होऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे, त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पंजाब, तामिळनाडू कर्नाटकपेक्षा जास्त निधी आपण दिला आहे. खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी 3 लाख रुपये देण्यात येणार आहे. विहिरीत गाळ भरला आहे, त्यासाठीही 30 हजारांची मदत दिली जात आहे. पीकविम्याचीही मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. सर्व निकष आणि अटी-शर्थी बाजूला ठेवून मदत केला जाणार आहे.