PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासा! पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता ऑगस्टला मिळणार; तारीख जाणून घ्या
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मतदारसंघात म्हणजेच वाराणसी, उत्तर प्रदेश येथून या हप्त्याचे वितरण एका विशेष कार्यक्रमातून करतील. या योजनेत दरवर्षी तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात.
आतापर्यंत योजनेच्या 19 हप्त्यांमधून जवळपास 9.8 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील गरजांमध्ये ही रक्कम उपयोगी ठरणारी आहे. यंदा सरकारने पारदर्शकता वाढवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) आणि आधार-बँक खात्याची लिंकिंग अनिवार्य केली आहे. यादरम्यान चुकीची माहिती दिल्यास हप्ता रोखला जाऊ शकतो.
तुमच्या खात्यात रक्कम आली का? अशी करा तपासणी:
1. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
3. आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा बँक खात्याचा तपशील टाका.
4. ‘Get Data’ वर क्लिक करताच तुमचा हप्ता मिळालाय की नाही, याची माहिती स्क्रीनवर दिसेल.
जर "Payment Success" असा संदेश दिसला, तर तुमचं पेमेंट पूर्ण झालंय. अन्यथा "e-KYC अपूर्ण", "चुकीचे बँक तपशील", किंवा "आधार लिंक नाही" अशी कारणं दाखवली जातील.
लक्षात ठेवा:
हप्ता मिळवण्यासाठी शेवटच्या तारखेपूर्वी e-KYC पूर्ण करा. जमिनीचे आणि बँकेचे तपशील अचूक असणे गरजेचे आहे. हप्ता थेट DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे खात्यात जमा केला जातो. कोणताही गैरवापर किंवा अपात्र लाभ टाळण्यासाठी आपले सर्व दस्तावेज अद्ययावत ठेवावेत. हप्ता न मिळाल्यास आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी किंवा सेवा केंद्राशी संपर्क साधावा.