मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यात अवजड वाहनांना बंदी
आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.
शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील चौपाट्यांवर पालिकेसह पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीमुळे वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना शहरात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गणपती विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. यामुळे प्रशासनाकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.