Pune : पुण्यात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; मानाचा पहिला कसबा गणपती टिळक चौकातून मार्गस्थ
दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.
गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मानाचा पहिला कसबा गणपती टिळक चौकातून पुढे मार्गस्थ झाल्याचे पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात कसबा गणपती लक्ष्मी रस्त्यावर येणार आहे.
कसबा गणपती पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी ही टिळक चौकातून पुढे मार्गस्थ झाल्याची माहिती मिळत आहे. गणपती बाप्पा मोरया चा जयघोष, ढोल ताशा गजर अशा मंगलमय वातावरणात बाप्पा मार्गस्थ झाले आहेत. मिरवणुकीत हजारो गणेशभक्तांचा सहभाग पाहायला मिळत आहे.
अजित पवार, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, रविंद्र धंगेकर, पुनीत बालन, अनेक गणेशभक्तांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे.