काबूल स्फोटाचा अमेरिकेकडून २४ तासात बदला; आयसिसच्या अड्ड्यावर ड्रोन हल्ला
अफगाणिस्तानाची राजधानी काबूलमध्ये गुरुवारी दोन स्फोट झाले. आयसिस-केच्या दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात १७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यात १३ अमेरिकन सैनिकांचा समावेश आहे. या स्फोटानंतर आता अमेरिकेनं प्रत्युत्तरादाखल जोरदार कारवाई सुरू केली आहे. शनिवारी (आज) अमेरिकन सैन्यानं आयसिस-केच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात काबूल स्फोटाचा कारस्थान रचणारा मारला गेल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे.
अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या नांगहार प्रांतात ही कारवाई करण्यात आली. अमेरिकन सैन्यानं ड्रोनच्या मदतीनं आयसिस-केच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं. नांगहार प्रांतात आयसिसचं वर्चस्व आहे. या हल्ल्यात काबूल स्फोटाचा सूत्रधार मारला गेल्याचा अमेरिकेचा दावा आहे. या हल्ल्यात कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला इजा झालेली नाही. अमेरिकेचं संरक्षण मंत्रालय असलेल्या पेंटागॉननं हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानातल्या नांगहार प्रांतात एक एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार आम्ही मुख्य सूत्रधाराचा खात्मा केला आहे, अशी माहिती सेंट्रल कमांडचे कॅप्टन बिल अर्बन यांनी दिली.