मुंबई बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन
मुंबई एपीएमसीमध्ये माथाडी कामगारांनी काम बंद केलं आहे. माथाडी कामगारांनी काम बंद केल्यानं बाजारसमित्यांमध्ये आलेल्या शेतमालाच्या गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. विक्री करण्यात आलेल्या मालाचे वजन 50 किलोपेक्षा जास्त असल्यानं काम बंद करण्यात आलं आहे.
शेतमालाच्या गोणीचं वजन 50 किलोंपेक्षा अधिक असू नये, असा नियम करण्यात आला आहे. हा नियम फळ मार्केट, भाजीपाला मार्केट, मसाला मार्केट व दाणा मार्केटमध्ये लागू करण्यात आला आहे. फळ मार्केट, भाजीपाला मार्केट आणि मसाला मार्केट, दाणा मार्केटमध्ये या नियमांची अंमलबजावणी करण्यात येते. मात्र, कांदा बटाटा मार्केटमध्ये अंमलबजावणी होत नसल्यानं माथाडी कामगार आक्रमक झाले. आणि त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं.
एपीमएसी प्रसासनावर आरोप
एपीएमसीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी कामगारांनी अचानकपणे काम बंद केले. त्यांनी यावेळी विक्री करण्यात येणाऱ्या मालाच्या गोण्यांचे वजन 50 किलो पेक्षा जास्त असल्याने काम बंद करण्याचा निर्णय घेतला. एपीएमसी प्रशासन व व्यापारी यासंदर्भातील शासन आदेशाकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप देखील यावेळी करण्यात आला.
कांदा मार्केटमध्ये नियम लागू करण्याची मागणी
50 किलो वजनाच्या गोणी संदर्भातील नियम अद्याप कांदा मार्केटमध्ये लागू करण्यात आला नसल्याने माथाडी वर्गात प्रचंड नाराजी होती. त्यामुळे 50 किलो पेक्षा अधिक वजनाची गोण उचलणार नसल्याचे सांगत माथाडी कामगारांनी कांदा बटाटा मार्केट मध्ये काम बंद आंदोलन पुकारलेय. आज कांदा बटाटा मार्केटमध्ये जवळपास 150 गाड्याची आवक झालीय. शेतमालाच्या गाड्या धक्क्यावर उभ्या आहेत.
कांदा मार्केटमधील माथाडी कामगारांच्या काम बंद आंदोलनावर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन काय तोडगा काढणार हे पाहावं लागणार आहे.