Ambernath | चोरट्यांनी मंदिरातली दानपेटी केली लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद
अंबरनाथमध्ये चोरट्यांनी थेट मंदिराच्या दानपेटीवरच डल्ला मारल्याची घटना घडलीये. अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली भागातील हनुमान मंदिरात ही चोरी झाली. हनुमान मंदिरात दैनंदिन पूजाअर्चा करणारे पुजारी हे मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास मंदिर बंद करून निघून गेले.
त्यानंतर ११.३० च्या सुमारास पुन्हा हे पुजारी मंदिरालगतच्या खोलीत येऊन झोपले. याच कालावधीत मंदिरात दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला आणि मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला. दानपेटीचं कुलूप तोडून त्यातून रक्कम या चोरट्यांनी चोरून नेली. यावेळी हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत. सकाळी मंदिर उघडल्यानंतर हा सगळा प्रकार पुजाऱ्यांच्या लक्षात आला.
दरम्यान, दानपेटीत नक्की किती रक्कम होती, हे सांगणं कठीण असलं, तरी त्यात ४० ते ५० हजार रुपयांची रोख रक्कम असेल, असा दावा मंदिराच्या पुजाऱ्यांनी केला आहे. तर या चोरीप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आम्ही स्वतःहून मंदिराच्या पदाधिकाऱ्यांना तक्रार देण्यासाठी बोलावलं, मात्र अद्याप तक्रार देण्यासाठी कुणीही आलेलं नसल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली आहे.