(Krasheninnikov Volcano) रशियाच्या कामचाटका द्वीपकल्पावर स्थित क्रशेनीनिकोव्ह (Krasheninnikov) नावाच्या सुप्त ज्वालामुखीचा तब्बल 600 वर्षांनंतर उद्रेक झाला आहे. हा स्फोट 3 ऑगस्ट रोजी झाला असून, त्याआधी 30 जुलै रोजी 8.8 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप या परिसरात झाला होता. त्या भूकंपानंतर केवळ 5 दिवसांत हा दुसरा ज्वालामुखी स्फोट झाला आहे. याआधी Klyuchevskoy ज्वालामुखीतही स्फोट झाला होता.
क्रशेनीनिकोव्ह ज्वालामुखीची उंची सुमारे 6,000 फूट (1,800 मीटर) आहे. स्फोटावेळी त्यातून जवळपास 6 किलोमीटर उंचीपर्यंत राखेचा जंबो ढग निर्माण झाला, अशी माहिती रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने टेलीग्रामवर दिली. सुदैवाने, या स्फोटामुळे कोणत्याही लोकवस्तीला धोका निर्माण झाला नाही.
याच दिवशी कामचाटका क्षेत्रात 7.0 तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. तो सकाळी 6:37 वाजता कुरिल बेटांमध्ये झाला. सुरुवातीला या भूकंपानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला होता, परंतु नंतर तो रद्द करण्यात आला.
या स्फोटामागे 30 जुलै रोजी झालेल्या मोठ्या भूकंपाचा परिणाम असल्याचा संशय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. अशा मोठ्या भूकंपांमुळे जर एखादा ज्वालामुखी आधीच स्फोटासाठी तयार स्थितीत असेल, तर त्याचे उद्रेक होण्याची शक्यता वाढते, असे US Geological Survey (USGS) चे म्हणणे आहे.
क्रशेनीनिकोव्हचा हा स्फोट सुमारे 600 वर्षांनंतर झाला आहे. Smithsonian Institution नुसार, याचा शेवटचा ज्ञात उद्रेक 1550 मध्ये झाला होता. सध्या वैज्ञानिक या क्षेत्रातील घडामोडींचा सखोल अभ्यास करत आहेत.