Dharashiv : धाराशिवच्या कालिका कला केंद्रात तुफान राडा; 2 जणांवर तलवार, कोयत्याने हल्ला
(Dharashiv) धाराशिव शहरातील चोराखळी भागात असलेल्या कालिका कला केंद्रात रात्री उशिरा झालेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून दोन व्यक्तींवर जवळपास 25 ते 30 जणांच्या जमावाने धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप गुट्टे आणि रोहित जाधव या दोघांवर तलवारी आणि कोयत्यासारख्या शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या गंभीर घटनेनंतर येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची दिशा निश्चित केली आहे आणि हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या प्रकारामुळे चोराखळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला आहे आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.