राज्यात एमडी ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थांच्या तस्करीवर आता थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, "राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ड्रग्जविरोधी स्वतंत्र युनिट कार्यरत असून, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत. मोठ्या गुन्ह्यांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. तसेच कायद्यात बदल करून अशा प्रकरणांवर मकोका अंतर्गत कारवाई करता येईल, यासाठी प्रस्ताव याच अधिवेशनात मांडण्यात येणार आहे."
या मुद्द्यावर भाजप आमदार परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, "एमडी ड्रग्जचा प्रसार फक्त युवकांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर शाळकरी मुलांपर्यंत पोहोचला आहे. मुंबई, पुण्यासह भंडारा, गोंदियासारख्या ग्रामीण भागांमध्येही हे व्यसन वाढत आहे. अटक झालेल्या आरोपींना वर्षभरात जामीन मिळतो आणि ते पुन्हा त्या गुन्ह्यात सामील होतात. त्यामुळे अशा तस्करांवर मकोका लावणार का?"
त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, "राज्यातील ड्रग्ज तस्करीच्या गंभीर प्रकरणांवर आता मकोका अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे, आणि त्यासाठी आवश्यक कायद्यात बदल करण्यात येणार आहेत." राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अंमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईला अधिक बळ मिळणार असून, ड्रग्ज माफियांवर अंकुश ठेवता येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.