थोडक्यात
अमेरिकेच्या संसदेबाहेर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 12 फूट उंच सोनेरी पुतळा उभारण्यात आला
या पुतळ्यात ट्रम्प यांच्या हातात बिटकॉइन
हा पुतळा सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत संसदेबाहेरील तिसऱ्या स्ट्रीटवर ठेवण्यात आला
(Donald Trump ) अमेरिकेच्या संसदेबाहेर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 12 फूट उंच सोनेरी पुतळा उभारण्यात आला असून, तो लोकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. या पुतळ्यात ट्रम्प यांच्या हातात बिटकॉइन दाखवले गेले आहे, ज्यामुळे तो अधिकच चर्चेत आला आहे. ही स्थापना फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरावरील निर्णयाच्या काही तास आधी करण्यात आली.
बुधवारी दुपारी फेडरल रिझर्व्हने प्रमुख व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात जाहीर केली. डिसेंबर 2024 नंतरची ही पहिली कपात असून, त्यामुळे दर 4.3 टक्क्यांवरून 4.1 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आगामी काळात आणखी 2 दरकपाती होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2026 मध्ये फक्त 1 कपात होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
हा पुतळा सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत संसदेबाहेरील तिसऱ्या स्ट्रीटवर ठेवण्यात आला होता. या प्रकल्पासाठी लागणारा निधी क्रिप्टोकरन्सीमध्ये रस असलेल्या गुंतवणूकदारांनी दिला आहे. आयोजकांनी स्पष्ट केले की, या स्थापनेमागे डिजिटल चलन, आर्थिक धोरण आणि सरकारी हस्तक्षेप याविषयी संवाद सुरू करण्याचा उद्देश आहे.
आयोजकांच्या मते, दिवसभर हा पुतळा संसदेबाहेरून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता आणि अमेरिकेत आधुनिक राजकारण व आर्थिक नवकल्पनांच्या चर्चेला नवा रंग देत होता.