Mohammed Nizamuddin
Mohammed Nizamuddin

Mohammed Nizamuddin : अमेरिकन पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय तरुणाचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

महबूबनगर जिल्ह्यातील रहिवासी मोहम्मद निजामुद्दीन असे मृत तरुणाचे नाव
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • अमेरिकन पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय तरुणाचा मृत्यू

  • महबूबनगर जिल्ह्यातील रहिवासी मोहम्मद निजामुद्दीन असे मृत तरुणाचे नाव

  • निजामुद्दीनने फ्लोरिडा कॉलेजमधून MS पूर्ण करून सॉफ्टवेअर क्षेत्रात काम सुरू केले होते

(Mohammed Nizamuddin) अमेरिकेत उच्च शिक्षण आणि करिअर घडवण्यासाठी गेलेल्या तेलंगणातील एका तरुणाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महबूबनगर जिल्ह्यातील रहिवासी मोहम्मद निजामुद्दीन (वय 30) असे मृत तरुणाचे नाव असून, तो 2016 पासून अमेरिकेत राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 3 सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियातील सांताक्लारा येथे रूममेटसोबत झालेल्या वादानंतर परिस्थिती चिघळली. या वादातून पोलिसांना बोलावण्यात आले. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी निजामुद्दीनला शस्त्र खाली ठेवण्याचे आदेश दिले. तो आदेश पाळला नसल्याचा आरोप करत पोलिसांनी गोळीबार केला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

निजामुद्दीनने फ्लोरिडा कॉलेजमधून MS पूर्ण करून सॉफ्टवेअर क्षेत्रात काम सुरू केले होते. काही वर्षांपूर्वीच बढती मिळाल्याने तो कॅलिफोर्नियात स्थायिक झाला होता. या घटनेची माहिती मिळताच त्याचे वडील मोहम्मद हसनुद्दीन यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना पत्र लिहून मुलाचे पार्थिव भारतात आणण्यासाठी मदतीची मागणी केली आहे. “माझ्या मुलाचा मृतदेह रुग्णालयात आहे, मात्र मृत्यूचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

या घटनेबाबत नातेवाईकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “पोलिसांनी नीट तपास न करता घाईघाईत कारवाई केली. किरकोळ वादावरून अशी मोठी कारवाई योग्य नाही,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कुटुंबीयांसोबतच मजलिस बचाओ तहरिकचे प्रवक्ते अमजद उल्ला खान यांनीही ट्विट करत परराष्ट्र मंत्रालयाने तत्काळ हस्तक्षेप करावा आणि मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत करावी, अशी मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com