आज शिक्षक दिन. प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देण्यात, त्याची जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व असते.
विद्यार्थी आणि शिक्षकाचे नाते हे फार खास असते. त्यांचे हे आतापर्यंत अनेक चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने अशाच काही खास चित्रपटांची माहिती असायला हवी.
सुपर ३० – या चित्रपटात शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील अद्भुत नात्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. विकास बहल यांनी सुपर ३० चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ३० मुलांना एकत्र आणून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी गणितज्ञ आनंद कुमार यांचे प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.
हिचकी – हिचकी हा चित्रपट शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यावर आधारित आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीनं नैना माथुर या शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. नैना माथुरला टुरेट सिन्ड्रम हा आजार असतो. या आजारामुळे तिच्या तोंडून सतत निघणाऱ्या आवाजांवर तिचे नियंत्रण नाही. आपल्या आजारामुळे खचून न जाता उलट त्यालाच शस्त्र करत नैना आपले शिक्षण पूर्ण करते. तिला शिक्षक म्हणून काम करायचं आहे आणि तिच्या आजारामुळे तिला सतत काम नाकारले जाते.अखेर नैनाला ती ज्या शाळेत शिकली होती त्याच शाळेत नोकरीची संधी मिळते. मात्र तिच्या हातात जो वर्ग येतो तो 'नववी फ' नावाच्या तुकडीखाली असलेल्या १४ टवाळ मुलांचा.. शिक्षण हक्क कायद्यामुळे महापालिका शाळेत शिकणारी ही १४ मुले या प्रतिष्ठित इंग्रजी शाळेत दाखल होतात.
तारे जमीं पर – बॉलिवूडमधील अतिशय हिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'तारे जमीं पर.'हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता आमिर खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात आमिरसोबतच दर्शील सफारी, टिस्का चोपडा आणि विपिन शर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.हा चित्रपट 'डिस्लेक्सिया' नावाच्या आजाराने पिडीत एका लहान मुलावर आधारित आहे.
ब्लॅक – संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन-राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका असलेला 'ब्लॅक'हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.राणी मुखर्जीने यात मिशेल नावाचे एक पात्र साकारले होते. या मुलीने लहान वयातच तिची दृष्टी आणि श्रवणशक्ती गमावली होती. त्यामुळे ती निराश होते. मात्र देबराज नावाचा एक शिक्षक तिला शिक्षित करतो.