पतीच्या हत्येच्या गंभीर आरोपाखाली तुरुंगात असलेली सोनम रघुवंशी सध्या शिलाँगच्या तुरुंगात बंदिस्त आहे. 21 जूनपासून ती अटकेत असून, तिच्या वागणुकीवरून ती तुरुंगाच्या वातावरणाशी लवकरच जुळवून घेत असल्याचं चित्र समोर आलं आहे. विशेष म्हणजे, इतक्या गंभीर प्रकरणात गुंतलेली असतानाही तिच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप किंवा खंत दिसत नाही.
तुरुंगातील दिनक्रमात रमलेली सोनम
सोनम सध्या महिला कैद्यांच्या गटात राहते. जेल प्रशासनानुसार, ती तुरुंगातील नियमांचे काटेकोरपणे पालन करते. ती इतर कैद्यांमध्ये मिसळते, परंतु वैयक्तिक आयुष्याविषयी बोलण्यास टाळाटाळ करते. तिच्या विरोधात तपास सुरू असतानाही, तुरुंगात तिचे वर्तन शांत आणि नियंत्रित असल्याचे सांगितले जाते. तुरुंगातील टीव्ही पाहणे, जेवणाचे ठरावीक वेळचे वेळापत्रक आणि सकाळ-संध्याकाळची हजेरी – या सगळ्या गोष्टींमध्ये ती सहभागी होते.
कुटुंबाशी संबंध तुटलेलेच?
गेल्या महिनाभरात सोनमच्या भेटीसाठी तिच्या कुटुंबातील कोणीही आलेले नाही. ना वडील, ना भाऊ, ना आई – कोणताही नातलग तिच्या चौकशीसाठी पुढे आलेला नाही. तुरुंगातून घरच्यांशी फोनवर बोलण्याची मुभा असतानाही, तिच्याकडे कोणीही फोन केलेला नाही, ना तिने कोणाशी संपर्क करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.
24 तास सीसीटीव्ही देखरेखीखाली
सोनमला जेल वॉर्डनच्या कार्यालयाजवळील कक्षात ठेवण्यात आलं आहे, जिथे तिच्यासोबत दोन इतर सीनियर महिला अंडरट्रायल कैदी आहेत. तिच्या हालचालींवर 24 तास सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. तरीही, ती कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा अस्वस्थता व्यक्त करत नसल्याचं सूत्रांकडून समजतं.
सोनम सध्या अंडरट्रायल असून, तिच्या विरोधातील आरोप सिद्ध होण्याची प्रक्रिया न्यायालयात सुरू आहे. पण आतापर्यंत तिच्या वागणुकीतून पश्चात्तापाचा लवलेशही जाणवलेला नाही. तुरुंगात रोजचं जीवन आणि बाह्य जगापासूनचा तुटलेला संपर्क – यामध्ये ती जणू स्वतःलाच हरवून बसली आहे.