कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच आता रायगड जिल्ह्यातील २० विद्यार्थांना कोरोनाची लागण तर दोन शिक्षकांना झाल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच जिल्हाधिकारी यांनी तातडीने जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
महाड तालुक्यातील विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील १८ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर वरंध येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थाला कोरोना झाल्याचे समजते. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील शाळा बंद करण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला असताना रायगड जिल्ह्यामध्ये निर्णय घेण्यास विलंब का केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांची प्रकृतिस्थिर आहे. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. तर अन्य विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत असल्याने आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.