(Ladki Bahin Yojana) विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत मोठा फेरफार करण्यात आला आहे. योजना सुरू झाल्यानंतर मिळालेल्या अर्जांची तपासणी पूर्ण होताच तब्बल 40 लाख 28 हजार महिलांना लाभ अपात्र ठरवण्यात आला असून, यापुढे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनेत दरमहा 1500 रुपये मिळवणाऱ्या सुमारे 14 लाख महिला शेतकऱ्यांचा लाभही कमी करून 500 रुपये दरमहा करण्यात आला आहे. या महिला देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी असल्याने त्यांच्या लाभात कपात करण्यात आली आहे. योजनेच्या नियमांनुसार एकाच महिलेला एकापेक्षा जास्त योजनांचा समान लाभ मिळू शकत नाही.
राज्यात 1 जुलै 2024 पासून ही योजना सुरू झाली होती. अर्जदार महिलांना सुरूवातीचे काही महिने लाभ सरसकट देण्यात आले. मात्र, त्यानंतर सखोल पडताळणी केली असता अनेक अपात्र लाभार्थी समोर आले. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या महिलांच्या नावापुढे 'एफएससी'असा शेरा मारण्यात आला आहे. त्या महिलांचा देखील योजनेचा लाभ बंद करण्यात आला आहे.