आदेश वाकले | संगमनेर | संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथील महावितरणच्या उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या आठ गावातील विज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे पठार भागातील संतप्त शेतकऱ्यांनी घारगाव येथील महावितरणच्या कार्यालयाला घेराव घातला.
पठार भागातील संतप्त शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता निखिल शेलार यांना जाब विचारला आहे. तसेच पठार भागात शेतकऱ्यांचे कांदा लागवडीची काम जोरदार चालू असताना, महावितरण विज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पठार भागातील शेतकऱ्यांना किमान आठ तास वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास जन आंदोलन करू, आणि आमच्या भावना व्यक्त करू, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान पठार भागातील आठ गावात 160 विजेचे रोहित्र वीजबिल थकबाकीच्या कारणाने खंडित केले. सर्व शेतकऱ्यांनी आपले थकीत वीजबिल भरून महावितरणला 4 ते 5 हजार रूपये भरावे असे महावितरणकडुन सांगण्यात आले आहे. मात्र पैसे भरण्यासाठी काहीशी मुदत द्यावी अशी शेतकऱ्याची मागणी केली आहे.