महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्वाची घडमोड घडण्याची शक्यता आहे. आगामी काळात राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या आधीच राजकारणात नवे भूंकप होणार असल्याचे संकेत भाजपचे संकटमोचक नेते म्हणून ख्याती असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. गिरीश महाजन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबाबत मोठी शक्यता वर्तवली आहे. त्यांचं हे भाकीत खरं ठरलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप आलेला बघायला मिळेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे पक्ष बांधणीच्या कामांसाठी नाशिकमध्ये आहेत. एकीकडे त्यांचा नाशिक दौरा असताना त्यांच्याच पक्षाचे नाशिकमधील बडे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र या भेटीने आता राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे.
गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?
"उद्धव ठाकरे गट हा जमीनदोस्त आणि नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. ते नाशिकला संघटनात्मक दृष्टीकोनावर चर्चा करुन गेले. त्यांच्याकडे आठ दिवसांत कोण राहणार ते बघा. या माणसाच्या बडबडीमुळे सर्व लोकं त्रासले हेत. मला वाटतं उद्धव ठाकरे हे देखील त्रासले असतील. ते आऊट ऑफ कंट्रोल झाले आहे. हा पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत", अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.