थोडक्यात
राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण
सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस
अतिवृष्टीमुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर
( Solapur Heavy Rain) राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह हलक्या सरी बरसत आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती.
सोलापुरातील अक्कलकोट, बार्शी, मोहोळ तालुक्यात जोरदार पाऊस आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर ग्रामीण, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून काल जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले.