मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी थेट राजीनाम्याची घोषणा केली आहे. परंतु, राजीनामा देऊ नये, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. तसेच, राजकीय वैचारिक भेद असू शकतात. पण, या प्रकारे अशा घटना घडल्या तर महाराष्ट्राला परवडणार नाहीत, असेही त्यांनी म्हंटले आहे.
अजित पवार म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट मी पाहिलं. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारे राजीनामा देऊ नये. त्यांनी राजकीय जीवनात खूप चढ उतार पाहिले आहेत. अशा घटना घडत असतात. कायद्याचा आदर केलाच पाहिजे.
त्या व्हिडिओमध्ये आव्हाड हे एका भगिनीला बाजूला जायला सांगत आहेत. त्यापेक्षा वेगळं काही नाही. मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितले पाहिजे की असं काही झाले नाही, असे आवाहनही त्यांनी एकनाथ शिंदे यांना केले आहे. राजकीय वैचारिक भेद असू शकतात. पण, या प्रकारे अशा घटना घडल्या तर महाराष्ट्राला परवडणार नाहीत, असेही त्यांनी म्हंटले आहे.
आव्हाड प्रकरणात असे कलम लावण्याची गरज नव्हती. यात शिंदे आणि फडणवीस यांनी लक्ष दिले पाहिजे. मी आव्हाड यांची भेट घेऊन त्यांना समजून सांगणार आहे. गुन्हा मागे घेतला पाहिजे ही आग्रही मागणी आहे. गुन्हा अपमानकारक आहे, असेही अजित पवार यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, वेदांता पाठोपाठ पाच मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले आहे. महागाई, बेरोजगारी, जे प्रकल्प राज्यातून बाहेर जात आहेत. त्याचे खापर आधीच्या सरकारवर फोडत आहेत. पूर्वीच्या सरकार वर किती खडे फोडणार आहात, असा सवालही त्यांनी विचारला आहे.