(Shivsena Vardhapan Din) शिवसेना पक्षाचा आज 59वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. दोन्ही गटांकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असून जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे. मुंबईमध्ये आज जल्लोषात शिवसेना स्थापना दिन साजरा होणार आहे.
शिवसेना पक्षात शिवसेनेतील पक्ष फुटीनंतरची आता ही तिसरी वेळ आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना हा आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे. उद्धव ठाकरे यांचा वर्धापन दिन यंदाच्या वर्षी सुद्धा षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाणार आहे. वर्धापन दिनाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे. ठाकरे कुटुंबियांसोबत ठाकरेंचे सर्व आमदार खासदार जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरे 7.30 च्या दरम्यान मेळाव्याला उपस्थित राहतील. कार्यक्रमापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुषमा अंधारे, भास्कर जाधव, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची भाषणे होतील.
यासोबतच एकनाथ शिंदे यांचा वरळीतील डोम एनएससीआय सभागृहात कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पाच वाजता या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. पाच वाजता नंदेश उमप यांचा संस्कृतिक कार्यक्रम असेल. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांची मुलाखत होणार आहे. त्यानंतर काही जेष्ठ नेत्यांची भाषणे होतील. यात ज्योती वाघमारे, गुलाबराव पाटील, रामदास कदम त्यानंतर सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे यांचे भाषण होणार आहे.
आजच्या या दोन्ही वर्धापन दिनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.