(Palna Yojana) महाराष्ट्र शासनाने नोकरदार महिलांसाठी मोठा दिलासा देणारी ‘पाळणा योजना’ जाहीर केली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेचा उद्देश कामकाजी मातांच्या 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना सुरक्षित व पोषणयुक्त वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे.
या योजनेअंतर्गत मुलांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळी पौष्टिक आहार मिळणार आहे. दूध, अंडी किंवा केळी यांचा समावेश असलेला नाश्ता तसेच नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण आणि पूरक आहार याचीही सोय केली जाईल. लहान मुलांसाठी पूर्व उद्दीपन तर 3 ते 6 वर्षे वयोगटासाठी पूर्वशालेय शिक्षणाची सोय उपलब्ध असेल.
राज्यातील पहिल्या टप्प्यात 345 पाळणा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी निधी केंद्र आणि राज्य शासन 60:40 या प्रमाणात उभारणार आहे. केंद्र शासनाने फेब्रुवारी 2024 मध्ये मान्यता दिल्यानंतर राज्याने ऑक्टोबर 2024 मध्ये अंमलबजावणीसाठी निर्णय घेतला आहे. या केंद्रांत महिन्यात 26 दिवस व रोज 7.5 तास सेवा दिली जाईल. प्रत्येक केंद्रात 25 मुलांची सोय असेल.
पाळणा सेविकेसाठी बारावी उत्तीर्ण व मदतनीसासाठी दहावी उत्तीर्ण पात्रता ठेवली आहे. सेविकेला 5500 रुपये, तर मदतनीसाला 3000 रुपये मानधन मिळेल. अंगणवाडी सेविका व मदतनीसांना अनुक्रमे 1500 व 750 रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, या योजनेमुळे मातांना नोकरीची संधी साधता येईल आणि मुलांना सुरक्षित वातावरण मिळेल. महिलांचे सबलीकरण आणि बालकांचा सर्वांगीण विकास साधणारी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.