Pune Municipal Elections : पुणे महापालिका निवडणूक प्रक्रिया पुन्हा रखडली; प्रभाग रचना जाहीर होण्यास विलंब

Pune Municipal Elections : पुणे महापालिका निवडणूक प्रक्रिया पुन्हा रखडली; प्रभाग रचना जाहीर होण्यास विलंब

मागील 3 वर्षांपासून थांबलेल्या पुणे महापालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला गती मिळणार अशी अपेक्षा होती. शासनाकडून निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार प्रारूप प्रभाग रचना 22 ऑगस्ट रोजी जाहीर होणार होती.
Published by :
Team Lokshahi
Published on

मागील 3 वर्षांपासून थांबलेल्या पुणे महापालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला गती मिळणार अशी अपेक्षा होती. शासनाकडून निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार प्रारूप प्रभाग रचना 22 ऑगस्ट रोजी जाहीर होणार होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या आक्षेपांमुळे हा निर्णय पुढे ढकलला गेला आहे. शासनाने सुरुवातीला 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान प्रभाग रचना प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविण्याची मुदत दिली होती. परंतु आता त्यात बदल करून 4 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच इच्छुकांना आपले मुद्दे मांडण्यासाठी आणखी काही दिवस मिळणार आहेत.

दरम्यान, गुरुवारी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने मुंबईत बोलावले होते. दिवसभर सादरीकरण करूनही केवळ अर्ध्या प्रभाग रचनेवरच चर्चा झाली. उर्वरित सादरीकरण शुक्रवारी पुन्हा होणार असल्याचे समजते. त्यामुळे आता प्रभाग रचना शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. महापालिकेकडून प्रभाग नकाशे प्रसिद्ध करण्याची संपूर्ण तयारी केली असून, शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ती जाहीर करण्याचे नियोजन आहे. मात्र, आयोगाकडून अंतिम परवानगी मिळणे बाकी आहे.

2017 मध्ये भाजपच्या ताब्यात पुणे महापालिका होती. पुढे 2021 च्या प्रभाग रचनेवर भाजपने हस्तक्षेप केला, असा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केला होता. OBC आरक्षणाचा प्रश्न न सुटल्याने निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या. सध्या राज्यात महायुतीची सत्ता असली तरी, प्रभाग रचनेवर शिवसेना व राष्ट्रवादीनेही असंतोष व्यक्त केला आहे. नगरविकास विभाग या प्रक्रियेची जबाबदारी सांभाळत असल्याने, आतापर्यंत झालेल्या आरोप-प्रत्यारोपांची खरी स्थिती आगामी रचनेनंतर स्पष्ट होईल. यामुळे पुणेकरांना अजून काही दिवस प्रभाग रचनेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सुधारित वेळापत्रक

प्रारूप प्रभाग रचना जाहीर : 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर

हरकती व सूचना दाखल : 5 ते 12 सप्टेंबर

सुनावणी : निश्चित वेळापत्रकानुसार बदल नाही

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com