(Maharashtra Rain) गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून दोन कोकण किनारपट्टीसह पुणे, सांगली, सातारा व मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढला आहे.
राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. मुंबई व उपनगरात, ठाणे आणि पालघरमध्येही पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असून आज 24 जुलै रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात दोन दिवस चांगला पाऊस पडेल. घाट विभागात अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागने व्यक्त केली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तसेच मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही आज रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.