(Solapur) दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर शिवारात गुरुवारी (7 ऑगस्ट) दुपारी घडलेल्या भीषण घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ऊसाच्या शेतात खत टाकण्याच्या कामादरम्यान लोखंडी पाइप उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला लागल्याने शेतमालक व मजुराचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये बसवराज शिवानंद पाटील (34) व रविकांत धोंडप्पा नाईकवाडे (37, दोघेही रा. हत्तूर) यांचा समावेश आहे. पावसामुळे बसवराज यांनी सकाळी तिघा मजुरांना घेऊन स्वतःच्या ट्रॅक्टरद्वारे ऊसाच्या शेतात खत टाकण्याचे काम सुरू केले होते. ट्रॅक्टरवर मोठा लोखंडी पाइप बसवून मशागत सुरू असताना, तो शेतावरून गेलेल्या उच्चदाब वीज वाहिनीला स्पर्श झाला.
यामुळे क्षणार्धात ट्रॅक्टरमध्ये विजेचा प्रवाह उतरला. चालक बसवराज व मजूर रविकांत यांना तीव्र विजेचा धक्का बसून ते बेशुद्ध पडले. जवळील लोकांनी तात्काळ त्यांना सोलापूरच्या मार्कंडेय रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. सुदैवाने, ट्रॅक्टरवर असलेले इतर दोन मजूर उडी मारून बाहेर पडल्याने ते बचावले.
घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे. अचानक घडलेल्या या अपघातामुळे हत्तूरसह परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी विजेच्या तारांजवळ शेतीकाम करताना सुरक्षिततेच्या उपाययोजना वाढवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.