Sanjay Raut : उद्धव ठाकरेंच्या आसनव्यवस्थेवरुन टीका करणारे 'भंपक'; राऊतांची विरोधकांवर टीका
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. मात्र, या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांना सहाव्या रांगेत बसवण्यात आल्याचे दृश्य समोर आले. या घडामोडीनंतर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली.
आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले —
"ठाकरे आसन व्यवस्थेवरून टीका करणारे भंपक आहेत. उद्धव ठाकरेसोबत फोटो घेतला नाही का, अशी विचारणा झाली. आपण पाहिलेच आहे, आसन व्यवस्थेवर येथे टीका होत आहे. प्रत्यक्षात समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन होते. उद्धवजी समोर बसले होते, पण उद्धवजींचं म्हणणं होतं की आपण स्क्रीनच्या अगदी समोरून सिनेमा पाहतो तेव्हा त्रास होतो. त्यांना तो त्रास झाला, म्हणून ते मागे गेले आणि आम्ही सगळेच गेलो. उद्धवजी तांत्रिक बाबींमध्ये थोडे माहिर आहेत. इथे नीट दिसत नव्हतं, नीट नाही आल्यामुळे ते मागे गेले. ते प्रेझेंटेशन चालू होतं आणि हे जे फालतू लोक आहेत, आयटी सेलवाले बीजेपीचे, त्यांनी हे समजून घ्यावं."
या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरून निर्माण झालेला वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे, मात्र भाजप-शिंदे गटाकडून यावर आणखी राजकीय टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.