संजय देसाई, सांगली | केंद्र सरकारच्या वतीने देशभर राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातल्या विटा नगरपालिकेने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.नगरपालिका विभागात विटा नगरपालिकेने हा बहुमान मिळवला आहे,अशी माहिती विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक वैभव पाटील यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील विटा नगरपालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.त्यामुळे विटा पालिकेने पुन्हा एकदा धवल यश मिळवले आहे.यावेळी पालिकेने स्वच्छ शहर म्हणून देशात अव्वल येण्याचा मान पटकावत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
विटा पालिकेचा दिल्ली येथील विज्ञान भवनात होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते गौरव होणार आहे.देशातील स्वच्छ शहरामध्ये महाराष्ट्रातील विटा पालिका पहिली, लोणावळा दुसरी आणि सासवड नगरपालिका तिसरी आली आहे.यामुळे देशाच्या पटलावर महाराष्ट्राने ही मोठी उपलब्धी केली आहे.आगामी काळात रोल मॉडेल म्हणून विटा शहराकडे पाहिले जाईल,असा विश्वास विटा नगरपालिकेच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.