Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

मुंबईतील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या ब्रँडवर टीका करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना खडेबोल सुनावले आहेत.
Published by :
Team Lokshahi

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने विजय संकल्प मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना उर्जा देत, आगामी रणांगणात महायुतीचा भगवा निश्‍चितपणे फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. मुंबईतील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या ब्रँडवर टीका करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना खडेबोल सुनावले आहेत. 

दरम्यान पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पुन्हा एकदा आपलं सैन्य उभं करावं लागेल. महाराजांनी किल्ले परत केले. पुन्हा एकदा 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित आपलं सैन्य उभं केलं आणि प्रत्येक किल्ला महाराजांनी परत मिळवला ती आमची प्रेरणा आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे 2019 ला आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं. 2022 ला आम्ही गणनिमी कावा दाखवला आणि 2024 ला पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं आणि आता पुन्हा एकदा आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे चाललो आहोत. आणि यावेळेस... काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचा महापौर बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता घरी जाणार नाही.”

पुढे भाषणात फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “साधी ती बेस्टची निवडणूक होती. आम्ही सांगितलं अरे बाबा कशाला पक्षावर लढायचं. पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे... त्यांनी ब्रँडचा वाजवला बँड! कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता. तुम्ही ब्रँड नाही. नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही.”

भाजपच्या परंपरेचा उल्लेख करताना त्यांनी अधोरेखित केले की, “भारतीय जनता पक्षामध्ये एक साधारण कार्यकर्ता अमित साटम देखील भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो. लोढाजीनंतर लोढांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही, शेलारांच्या नंतर शेलारांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही. हे कार्यकर्त्यांचं नेतृत्व आहे. आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड बनतो. त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये. आमच्याकडे जगातला सर्वात मोठा ब्रँड आहे नरेंद्र दामोदरदास मोदी.”

केंद्रातील नेतृत्वावर होणाऱ्या टीकेवरही फडणवीसांनी हल्ला चढवला. “काही उचक्क्य रोज सकाळी उठून मोदींना प्रश्न विचारतात. पण अशा उचक्यांना उत्तर हे मुंबईच्या जनतेने 2024 च्या विधानसभेमध्ये दिलं. मुंबई कोणाची? याचं उत्तर सातत्याने 2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभेमध्ये मुंबईकरांनी दिलं – मुंबई ही भाजपची, मुंबई ही महायुतीची. महायुती म्हणजे शिवसेना, आणि शिवसेना म्हणजे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आता त्या शिवसेनेचे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदे.”

विरोधकांच्या भाषणशैलीवर टीका करताना फडणवीस म्हणाले, “अनेक वेळा मला आश्चर्य होतं, यांची भाषणं बघा काय बोलतात. यांच्या भाषणांमध्ये विकासावर एक वाक्य दाखवा, 100 रुपये द्यायला तयार आहे. गेली दहा भाषणं काढा आणि मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणाऱ्या विकासाच्या व्हिजनचं एक वाक्य दाखवा.”

महापालिकेची निवडणूक जवळ येत असताना भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीचा झेंडा मुंबईत फडकवण्याचा निर्धार या मेळाव्यातून स्पष्ट झाला. फडणवीसांच्या भाषणातून महायुती कार्यकर्त्यांना ‘शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे पुन्हा लढा देण्याचं’ आवाहन करण्यात आलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com