थोडक्यात
दहिसर टोलनाका आता वर्सोवा पुलासमोर
प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने निर्णय
मीरा-भाईंदरच्या वेशीवर होत होती कोंडी
(Dahisar Toll Naka)मीरा-भाईंदरच्या वेशीवर असलेला दहिसर टोलनाका हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा नाका आता दोन किलोमीटर पुढे, वर्सोवा पुलासमोरील नर्सरीजवळ स्थलांतरित होणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, दिवाळीपूर्वी हे स्थलांतर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
हा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या टोलनाक्यामुळे मीरा-भाईंदरमधील नागरिक, वाहनचालक तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत होता. टोलनाका पुढे गेल्याने नागरिकांना दिलासा मिळेल आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवला असून, केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर स्थलांतराची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल. बैठकीत स्थानिक आमदार, महामंडळाचे अधिकारी तसेच पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.