(Monorail ) मोनोरेलमध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्याने घडलेल्या घटनेनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरक्षेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पुढे मोनोरेल गाडीत 104 टनांपेक्षा जास्त प्रवासी असल्यास ती गाडी मार्गावर सोडली जाणार नाही. तसेच गाडीमध्ये ओव्हरलोड झाल्यास प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवूनच गाडी पुढे पाठवली जाईल.
मोनोरेलच्या गाड्यांची रचना 104 टनांपर्यंतच्या क्षमतेसाठी केली आहे, परंतु गेल्या 10 वर्षांपासून या गाड्या धावत असल्याने त्यांची कार्यक्षमता काही प्रमाणात घटली आहे. त्यामुळे भविष्यात अपघाताचा धोका टाळण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा निर्णय एमएमआरडीएकडून घेण्यात आला आहे.
मंगळवारी घडलेल्या घटनेत, प्रवासी क्षमतेची मर्यादा 562 असतानाही एका गाडीत 582 आणि दुसऱ्या गाडीत 566 प्रवासी असल्याचे आढळले. जादा भारामुळे वळणावर गाडी झुकली आणि करंट कलेक्टर व पॉवर रेल यांचा संपर्क तुटला. त्यामुळे गाडी अचानक थांबली आणि ब्रेक न सुटल्याने ती पुढे नेता आली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीने प्रवाशांची सुटका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रत्येक गाडीत सुरक्षा रक्षक तैनात करण्यासोबत मोनो पायलटसह एक तांत्रिक कर्मचारी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक मोनोरेलमध्ये 8 आपत्कालीन खिडक्या असतात. त्यांची तपासणी करून स्पष्ट दिशादर्शक लेबल लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याची माहिती फलकांवर स्पष्ट करण्यात येणार आहे.