Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया
बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला जोरदार दणका बसल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या भेटीत नेमकं काय झालं, कोणत्या विषयांवर चर्चा झाली, यावरून विविध तर्कवितर्क रंगत असतानाच राज ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
राज ठाकरे यांनी या भेटीबाबत भाष्य करताना सांगितलं की, वाहतूक कोंडी, शहरी नियोजन आणि पुनर्विकासाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. “रस्ते कमी, वाहनांची संख्या वाढलेली आणि पार्किंग सुविधांचा अभाव यामुळे मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक या शहरांमध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. योग्य आराखडा नसेल तर पुढील काळ अधिक कठीण होईल,” असे ते म्हणाले. त्यांनी ट्रॅफिकची सध्याची परिस्थिती देशाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करते, असंही स्पष्ट केलं.
दरम्यान पुढे ते म्हणाले की, "हत्ती कबुतर असे विषय आले की तुम्ही दाखवू नका मग असे विषय पुढे येणारच नाही. आपल्या घरात उंदीर आला तर आपण काय करतो? गणपतीचे वाहन आहे म्हणून आपण उंदरी घरात ठेवतो का? असे कोण जैन लोक आहेत जी कबुतरांवर बसून फिरायला जातात? माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? "
उपस्थितीत पत्रकारांनी बेस्ट पतपेढी निवडणुकीबाबत विचारले असता, राज ठाकरे यांनी विषय टाळण्याचं धोरण अवलंबलं. “हो मी वाचलं... पण हा विषय मला माहिती नाही. निवडणुका स्थानिक आहेत, पतपेढी निवडणुका म्हणजे छोटी गोष्ट आहे. तुम्हाला 24 तास काहीतरी दाखवायला हवं म्हणून तुम्ही त्याला महत्त्व देता,” असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया टाळली. दरम्यान, नुकत्याच झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीला 21 पैकी एकाही जागेवर यश मिळालं नाही.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक ‘लिटमस टेस्ट’ मानली जात होती. मात्र, निकालाने ठाकरे बंधूंच्या युतीच्या भविष्यासंबंधी प्रश्न निर्माण केले आहेत. याआधीही हिंदीसक्तीविरोधातील मोर्चाच्या तोंडावर राज ठाकरे यांनी फडणवीस यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्याने खळबळ माजली होती. त्यामुळेच बेस्ट निवडणुकीत पराभवानंतर लगेच झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात असून, ‘टायमिंग’वरून राजकीय चर्चांना वेग आला आहे.