( Monorail ) मोनोरेल सेवेत पुन्हा एकदा अडथळा निर्माण झाला आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास आचार्य अत्रेनगर स्थानकावर मोनोरेल जवळपास पंधरा मिनिटे थांबून राहिली. गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने मोनोरेल थांबून राहिली. त्यामुळे तातडीने 50 प्रवाशांना उतरविण्यात आलं आणि त्यानंतर मोनोरेल पुन्हा सुरु करण्यात आली.
याआधी 19 ऑगस्ट रोजीही मोनोरेलमध्ये अशाच प्रकारचा अनुभव प्रवाशांना आला होता. मुसळधार पावसामुळे मंगळवारी मोनोरेल बंद पडल्याने सेवा संपूर्ण दिवस विस्कळीत झाली होती. त्या वेळीही गाडीत अपेक्षेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने मोनोरेल एका बाजूला झुकली होती. अखेर अग्निशमन दलाच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढावे लागले होते.
एमएमआरडीएकडून या सर्व घटनांची गंभीर दखल घेण्यात आली असून, मोनोरेल संचालन करणाऱ्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कंपनीला (एमएमएमओसीएल) तीन दिवसांत तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा विभागासोबत झालेल्या बैठकीतही प्राथमिक चौकशीत ‘अतिवजन’ हेच मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.
सामान्यतः मोनोरेलची क्षमता 520 प्रवाशांची असते, परंतु अलीकडच्या घटनांमध्ये ही संख्या 580 पेक्षा अधिक झाली होती. वजन जास्त झाल्याने विद्युत पुरवठा खंडित होतो आणि गाडी पुढे सरकत नाही, असा तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भविष्यात कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.