(Mira Bhayandar) मुंबई महानगरपालिकेने शहरातील कबुतरखाने हटवण्यास सुरुवात केल्यानंतर वाद निर्माण झाला असून याच पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कबुतरांना दाणे टाकू नका, असे सांगितल्याने एका वृद्ध नागरिकावर आणि त्यांच्या मुलीवर हल्ला करण्यात आला आहे.
ही घटना रविवारी मीरारोड येथील ठाकूर मॉलजवळील डीबी ओझोन इमारतीत घडली. महेंद्र पटेल हे सकाळी दूध आणण्यासाठी गेले असता परत येताना त्यांनी शेजारच्या आशा व्यास यांना कबुतरांना दाणे टाकताना पाहिले. त्यांनी त्यांना विनंती केली की, इमारतीसमोर कबुतरांना दाणे टाकू नका. यावरून वाद उफाळला आणि शिवीगाळ सुरू झाली.
गोंधळ ऐकून महेंद्र पटेल यांची मुलगी प्रेमल पटेल खाली आली आणि तिने हस्तक्षेप करत व्यास यांना कारण विचारले. काही वेळातच सोमेश अग्निहोत्री नावाचा व्यक्ती दोन अनोळखी लोकांसह घटनास्थळी आला. त्यांनी लोखंडी रॉडने प्रेमल पटेल यांच्यावर हल्ला केला. तर दुस-याने त्यांचा गळा दाबल्याची प्रेमल हीने तक्रार दिली. याप्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात सोमेश अग्निहोत्री, आशा व्यास आणि इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.