Hindustani Bhau On Mahadevi : महादेवी हत्ती प्रकरणावर हिंदुस्तानी भाऊची टीका! शिवसेनेची संतप्त प्रतिक्रिया, "कोल्हापुरात येऊन दाखव..."
महादेवी हत्तीच्या पुनर्प्रस्थापनेसाठी कोल्हापुरात सुरू असलेल्या आंदोलनावर युट्युबर हिंदुस्तानी भाऊ यांनी सोशल मीडियावर टीकात्मक पोस्ट केली आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. "कोल्हापूरबद्दल काही बोलायचं असेल, तर इथं येऊन जनतेसमोर बोलून दाखवा," असा थेट इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, "महादेवी हत्ती परत आणण्याच्या आंदोलनामागे कुठलाही राजकीय अजेंडा नाही. हे कोल्हापूरच्या जनतेच्या भावना आणि संस्कृतीशी जोडलेलं आंदोलन आहे. काहीजण मात्र सोशल मीडियावरून या विषयाचा विपर्यास करून स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत." हिंदुस्तानी भाऊ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये कोल्हापूरविरोधात अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसैनिकांनी म्हटलं, "कोल्हापूरच्या अस्मितेवर वार करणं आम्ही सहन करणार नाही. हिंमत असेल तर आंदोलकांपुढे येऊन तीच भाषा वापरून दाखवा."
शिवसेना अधिक आक्रमक होत म्हणाली, "कोल्हापूरी माणूस केवळ पायात नाही, तर हातातही 'सुताखणे' ठेवतो. सोशल मीडियावर बसून टीका करणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात लोकांसमोर येणं कठीण आहे. कोल्हापुरात याल तर तुमचं स्वागतच होईल पण तोंडदेखील बंद करावं लागेल." शिवसेनेचा आरोप आहे की, निवडणुका जवळ आल्याने काही युट्युबर्स आणि राजकीय मंडळी महादेवी हत्तीच्या मुद्द्याचा राजकीय वापर करत आहेत. "गेल्या अनेक वर्षांपासून महादेवी उर्फ माधुरी कोल्हापुरात आहे, पण कुणीही तिच्याकडे फिरकले नाही. आता अचानक हा विषय गाजवण्यामागे हेतू काय?" असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
एका व्हिडिओद्वारे हिंदुस्तानी भाऊ यांनी सांगितलं, "मी हिंदू आणि हिंदुत्वावर बोलतो तेव्हा काही लोकांना अस्वस्थता होते. यामुळेच कदाचित माझं इंस्टाग्राम अकाउंट रिपोर्ट करून बंद केलं गेलं होतं. आज ते परत मिळालं, आणि मी बघितलं की अनेक लोकांचे डीएम्स आले आहेत." त्यांनी कुणाचंही नाव न घेता, महादेवी प्रकरणाचा वापर करून काहीजण वैयक्तिक द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला. या वादामुळे महादेवी हत्तीच्या आंदोलनासोबतच सोशल मीडियावर राजकीय आणि सामाजिक वादळही उठलेलं आहे. कोल्हापूरच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.