छत्रपती संभाजीनगर येथील छावणी परिसरातील विद्यादीप बालगृहात राहणाऱ्या 9 अल्पवयीन मुलींनी सोमवारी (30 जून) दुपारी बालगृहातून पलायन करून थेट जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या हातात दगड व लोखंडी पाने असल्याने कोर्ट परिसरात एकच गोंधळ उडाला. या मुलींनी बालगृहात होणाऱ्या मारहाणीचा, जातीय भेदभावाचा आणि मूलभूत सुविधांच्या अभावाचा आरोप केला.
सुमारे दुपारी 12.15 वाजता या 9 मुलींनी बालगृहाच्या मागील दरवाज्याद्वारे आणि कंपाउंडवरून उडी मारून पळ काढला. त्यांनी न्यायालय गाठत तेथील वकील, नागरिक आणि पोलिसांसमोर आपले दु:ख व्यक्त केले. हा प्रकार समजताच बालगृह प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली.
यावर उलटसुलट चर्चा सुरू असून, मुलींना बालगृहातील व्यवस्थापनाच्या दबावामुळे पूर्ण सत्य सांगता येत नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या तक्रारींची आणि जबाबांची गंभीर दखल बालकल्याण समिती घेत आहे.
दरम्यान, या मुलींना पकडण्यासाठी दामिनी पथकाने पाठलाग केला. या प्रयत्नात दोन मुली पसार झाल्या. पळून जाताना त्यांनी दामिनी पथकाच्या वाहनांवर दगडही भिरकावले. पोलिसांनी उर्वरित 7 मुलींना ताब्यात घेऊन बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा