Rahul Gandhi On Government : 3 महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी संपवले आयुष्य; राहुल गांधींचा सरकारवर घणाघात

Rahul Gandhi On Government : 3 महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी संपवले आयुष्य; राहुल गांधींचा सरकारवर घणाघात

विदर्भातील शेतकऱ्यांच्या वेदनेवर राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका
Published by :
Shamal Sawant
Published on

राज्याच्या कृषी क्षेत्राचा कणा असलेल्या शेतकरी वर्गासमोरील आत्महत्येचं संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चाललं आहे. महाराष्ट्र विधानसभेत नुकत्याच सादर झालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत राज्यात तब्बल 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश घटना विदर्भातील आहेत, जो भाग आधीपासूनच दुष्काळ आणि आर्थिक ताणाखाली आहे.

या चिंताजनक परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट केंद्र सरकारला जबाबदार धरत टीकेची झोड उठवली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर त्यांनी भावनिक स्वरूपाची पोस्ट शेअर करत लिहिलं — "हे फक्त एक संख्या नाही, ही 767 उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची वेदना आहे."

राहुल गांधींनी महागाई, वाढती खते-बियाण्यांची किंमत, डिझेल व वीजदर यांचा उल्लेख करत म्हटलं की, शेतकरी दिवसागणिक कर्जबाजारी होत आहे. सरकार त्यांचं ऐकायला तयार नाही आणि हमीभावाची (MSP) हमीही दिली जात नाही. "जेव्हा हेच शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात, तेव्हा त्यांना दुर्लक्षित केलं जातं," असंही त्यांनी नमूद केलं.

'श्रीमंतांना माफी, शेतकऱ्यांना फसवणूक?'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवत राहुल गांधी म्हणाले, "मोदी सरकार उद्योगपतींची कोट्यवधींची कर्जं सहज माफ करतं, पण अन्नदात्याच्या वेदनेकडे पाठ फिरवली जाते. आज बातमी आली की अनिल अंबानी यांच्यावर 48 हजार कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण आहे, आणि सरकार गप्प बसलेलं आहे."

त्यांनी पुढे म्हटलं, "शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं, पण आज अन्नदात्याचं आयुष्यच अर्धं उरलंय. संपूर्ण यंत्रणा शांत आहे आणि मोदी मात्र स्वतःच्या प्रसिद्धी मोहिमेत मग्न आहेत."

आत्महत्यांचे तपशील:

कालावधी: जानेवारी ते मार्च 2025

आत्महत्या केलेले शेतकरी: 767

सर्वाधिक घटना: विदर्भ विभाग

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा हा काळा अध्याय संपायचं नाव घेत नाही, आणि राजकीय पातळीवर प्रश्न उपस्थित होण्याची गरज अधिक तीव्र बनत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com