सध्या सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रसिद्ध ज्वेलर्स दुकानातील घडलेली ही घटना सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे. एका वृद्ध दाम्पत्याने प्रेमाने घेतलेली भेट आणि दुकानदाराने दिलेले माणुसकीचं उदाहरण अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणत आहे.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आंभोरा जहागीर गावातील 93 वर्षीय निवृत्ती सखाराम शिंदे आणि त्यांची पत्नी शांताबाई शिंदे हे वृद्ध दाम्पत्य आपल्या आयुष्याचा शेवटचा टप्पा प्रेमाने जगत आहेत. हे दोघं छत्रपती संभाजीनगरमध्ये 'गोपिका' नावाच्या प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानात गेले होते. दुकानदाराला सुरुवातीला वाटलं की ते काही मदतीसाठी आले असावेत, पण त्याला लक्षात आलं की आजोबा आपल्या पत्नीला एक दागिना भेट देण्यासाठी आले आहेत.
दुकानदाराच्या मनाला हे दृश्य स्पर्शून गेलं. त्यामुळे त्यांनी शिंदे दाम्पत्याला त्यांच्या पसंतीचा गळ्यातील दागिना मोफत दिला. या अचानक मिळालेल्या दिलदार भेटीमुळे वृद्ध दांपत्याचे डोळे पाणावले. त्यांनी दुकानदाराचे आभार मानताच दुकानातील सर्व वातावरण भावूक झालं.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून या दुकानदाराच्या माणुसकीला सलाम केला जात आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, "हाच खरा भारत आहे... इथे अजूनही प्रेम आणि माणुसकी जिवंत आहे" या घटनेने जणू समाजात एक सकारात्मक ऊर्जा पसरवली असून, अशा हृदयस्पर्शी घटनाच खऱ्या अर्थाने ‘वात्सल्याचा दागिना’ ठरतात.